केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! तिसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; तपासात मोठा खुलासा..

पुणे : केतन विशाल अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला आणखी एक महत्त्वाचा धागा सापडला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यानंतर आता नीरज कुमार नावाच्या तिसऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण कटामागे आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा तपास वेगाने सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन चौधरीने तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचे लोकेशन लपवण्यासाठी विशेष नियोजन केले होते. 18 जून रोजी घडलेल्या घटनेच्या दिवशी त्याने स्वतःचा मोबाईल फोन घरीच ठेवला होता. त्यामुळे त्याचे लोकेशन घटनास्थळाशी जोडले जाणार नाही, असा त्याचा प्रयत्न होता.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चेतन चौधरीने त्याच्याकडे काम करणाऱ्या नीरज कुमारचा मोबाईल फोन सोबत घेतला होता. लोहगड परिसरात असताना त्याने याच मोबाईलवरून सिया गोयलशी संपर्क साधल्याचे तांत्रिक तपासात समोर आले आहे. कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हा तपशील उघड केला.

त्यानंतर संबंधित मोबाईल नीरज कुमारचा असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नीरजला या कटाची पूर्वकल्पना होती का, त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग होता का, अथवा त्याच्या नकळत मोबाईलचा वापर करण्यात आला होता का, याचा तपास सध्या सुरू आहे.

या नव्या खुलाशामुळे हत्याकांडाच्या तपासाला आणखी एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी मोठे नियोजन केल्याचा संशय अधिक बळकट झाला असून, पोलिस आता सर्व तांत्रिक पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांची पडताळणी करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांचा तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.