डीजेच्या दणदणाटापासून थेट निवडणुकीच्या रिंगणात? पुणे पदवीधर मतदारसंघात नवा ट्विस्ट, विद्यानंद बापट मैदानात उतरणार? असीम सरोदेंच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण


पुणे : गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाविरोधातील भूमिकेमुळे राज्यभर चर्चेत आलेले विद्यानंद बापट आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केलेल्या एका सूचक पोस्टमुळे बापट यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशाला चर्चेची हवा मिळाली आहे. मात्र, बापट यांनी अद्याप स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही.

असीम सरोदे यांनी २२ सप्टेंबरला सोशल मीडियावर विद्यानंद बापट यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. ध्वनिप्रदूषणाविरोधात निर्भयपणे भूमिका घेणारे, सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे आणि उत्सवांच्या बदलत्या स्वरूपावर प्रश्न उपस्थित करणारे व्यक्ती म्हणून त्यांनी बापट यांचा उल्लेख केला. त्यानंतर सरोदेंनी थेट सवाल केला की, विद्यानंद बापट यांनी पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का? या पोस्टनंतर बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू झाली.

डीजेविरोधातील भूमिकेमुळे आधीच चर्चेत

गणेशोत्सवात डीजे आणि मोठ्या आवाजाच्या वापराविरोधात बापट यांनी सातत्याने आवाज उठवला होता. त्यांच्या भूमिकेवरून पुण्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यांच्या वक्तव्यांवरून वादही झाले आणि त्यांना कायदेशीर नोटीसही देण्यात आली होती. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी २० मंडळे आणि डीजे चालक-मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पुणे पदवीधरची निवडणूक कधी?

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी २९ सप्टेंबरला अधिसूचना निघणार असून ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी, तर ९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. २३ ऑक्टोबरला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

आधीच इच्छुकांची गर्दी

पुणे पदवीधर मतदारसंघात यापूर्वी अरुण गणपती लाड यांनी २०२०मध्ये भाजपचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला होता. आता आगामी निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड भाजपकडून इच्छुक असल्याचे वृत्त आहे. तसेच अजित पवार गटाकडून प्रताप माने यांच्या नावाची चर्चा असल्याचेही समोर आले आहे. महाविकास आघाडीकडूनही उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू आहे.

अशा पार्श्वभूमीवर असीम सरोदेंच्या एका प्रश्नामुळे विद्यानंद बापट यांच्या नावाची भर या निवडणुकीच्या चर्चेत पडली आहे. बापट खरोखरच निवडणूक लढवणार का, की ही केवळ चर्चेची सुरुवात आहे? याचे उत्तर उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!