मान्सूनचा नवा अंदाज जाहीर; कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार? महत्त्वाची माहिती समोर..

पुणे : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतानाच जागतिक हवामान क्षेत्रातून चिंताजनक माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेनुसार यंदा ‘अल निनो’ची परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यामुळे भारतासह अनेक देशांच्या हवामान पद्धतीत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून विशेषतः शेती, पाणी साठे आणि अन्नधान्य उत्पादनावर याचा परिणाम होऊ शकतो, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या मान्सून केरळच्या उंबरठ्यावर पोहोचला असून देशभरात पावसाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र प्रशांत महासागरातील वाढते तापमान हवामान तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
‘अल निनो’ ही एक नैसर्गिक हवामान प्रक्रिया असून यात पूर्व आणि मध्य प्रशांत महासागरातील पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे वारे, ढगांची निर्मिती आणि पर्जन्यमान यावर थेट परिणाम होतो.

हवामान अंदाजानुसार जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये मान्सून तुलनेने सामान्य राहण्याची शक्यता आहे. मात्र सप्टेंबरनंतर अल निनोचा प्रभाव वाढू शकतो, ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याचा परिणाम उशिरा पेरणी झालेली पिके, जलसाठे, धरणे आणि भूजल पातळीवर होऊ शकतो. पाऊस कमी झाल्यास सोयाबीन, कापूस, तूर आणि भात यांसारख्या प्रमुख पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच उत्पादन घटल्यास अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे आगामी काही महिने हवामान आणि शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत