केडगाव चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्राने राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत पटकवला प्रथम क्रमांक

केडगाव : अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय लावणी स्पर्धा स्मृती भवनात येथे 1 व 2 फेब्रुवारी रोजी पार पडल्या. या स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी प्रथम क्रमांक तीन कला केंद्रांना विभागून देण्यात आला.
यात न्यू अंबिका कला केंद्र केडगाव चौफुला अर्चना वानवडकर वेळे कालिका कला केंद्र चोरखळी यांना देण्यात तर दुसरा क्रमांक शीतल पूजा भूमकर सणसवाडी अनिता परभणीकर मोडनिंब, तिसरा क्रमांक प्रीती परळीकर न्यू अंबिका कला केंद्र चतुर्थ क्रमांक, सुनीता लखणगावकर नटरंग कला केंद्र मोडनिंब तर उत्कृष्ठ लावणी अदाकारी कलावंत म्हणून प्रीती परळीकर, उत्कृष्ठ तबला वादक निलेश डावळे, उत्कृष्ट डोलकी वादक अर्जुन शिंदे, उत्कृष्ट गायिका कल्याणी गायकवाड, उत्कृष्ठ हार्मोनियम वादक विकी जावळे आणि उत्कृष्ट मुजरा प्रीती परळीकर यांना सन्मानित करण्यात आले.
प्रथम क्रमांकच्या विजेत्यांना प्रत्येकी 3 लाख रुपये रोख आणि स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल, जयंती समारंभ समितीचे जयसिंग मोहिते पाटील व आयोजिका स्वरूपाराणी मोहिते पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आयोजक जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, की पारंपरिक लावणी कला संपत चालली असून तिचे जतन करण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे. तसेच माजी मंत्री दिलीप सोपल आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की गेली कित्येक वर्ष मोहिते पाटील परिवार लावणी कला टिकवण्यासाठी झटत असून लावणी कला ही संस्कृती जपली पाहिजे आणि त्यासाठी मोहिते पाटील कुटूंबाचे खूप मोठे योगदान राहिले आहे.
मोहिते पाटील परिवाराकडून यांच्या लावणी कलेला राजाश्रय मिळाला असून या लावणी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि विजेतेपद मिळवण्यासाठी राज्यातील सर्वच कलाकार मेहनत घेत असतात. तसेच तोडीचे नियोजन या ठिकाणी केले जाते. त्यामुळे खऱ्या अर्थाने अकलूज लावणी स्पर्धेमुळे लावणी कला जिवंत आहे, असे तमाशा थिएटर मालक संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी म्हटले.