‘महायुतीत नवा सत्ता फॉर्म्युला?’; सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करण्याची राष्ट्रवादीची उघड मागणी

नंदुरबार : राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना नवे वळण मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी महायुतीकडे उर्वरित कार्यकाळासाठी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी करत सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे केले. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याचवेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस दिल्लीला जाऊ शकतात, तर त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतील, असा दावा केला होता. आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत व्यक्त केले होते. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांचेही नाव पुढे केले होते.
या पार्श्वभूमीवर डॉ. मोरे यांनी महायुतीत सत्ता वाटपाचा नवा फॉर्म्युला सुचवला. त्यांच्या मते, महायुतीच्या सुरुवातीच्या अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले, तर सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार कार्यरत आहे. त्यामुळे पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसलाही नेतृत्वाची संधी मिळावी.

सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या पुरोगामी विचारांना पुढे नेले असून, त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देणे ही महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याची ऐतिहासिक घटना ठरेल, असे मोरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही हीच भावना असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाबाबत महायुतीतील कोणत्याही वरिष्ठ नेत्याने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. अंतिम निर्णय हा महायुतीच्या शीर्ष नेतृत्वाकडेच राहणार असला, तरी राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आल्याने राज्यातील राजकीय चर्चांना नवे अधिष्ठान मिळाले आहे.