नाशिक हादरलं! आंघोळीचा साबण खाल्ल्याने 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

नाशिक : नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली असून आंघोळीचा साबण खाल्ल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव अथर्व द्विवेदी असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अथर्वने साबण का खाल्ला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. साबण खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याला तीव्र त्रास जाणवू लागला. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

अथर्व हा ‘स्पेशल चाइल्ड’ असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला वस्तू ओळखण्याची किंवा काय खावे-खाऊ नये याची पूर्ण समज नसल्यामुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इंदिरानगर, नाशिक पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.