Narendra Modi : आम्ही एफआरपी वाढवली, पण मोठ्या नेत्याने काय केलं? मोदींची पुन्हा एकदा शरद पवारांवर जोरदार टीका…

Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सभा घेत आहेत. यामध्ये ते प्रामुख्याने शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्रातील नेते केंद्रात कृषिमंत्री होते. या मोठ्या नेत्याने उसाच्या एफआरपीसंबंधी काय केले? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

त्यांच्या काळात उसाची एफआरपी क्विंटलला केवळ 200 रुपये होती. ती आम्ही साडेतीनशे रुपये केली, असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथील कृषी विभागाच्या मैदानात प्रचार सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.
आपल्या भाषणात मोदी यांनी शेतकर्यांसाठी राबवलेल्या योजनांचा आढावा घेतला. साखर कारखान्यांचे जुने इन्कमटॅक्स आमच्या सरकारने माफ केले. काँग्रेसचा पंजा शेतकर्यांना लुटत होता. परंतु आम्ही तीन हजार कोटी रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा केले, असे म्हणत त्यांनी कृषीच्या योजना आपण राबवल्याचे सांगितले.

तसेच ते म्हणाले, पूर्वी इथेलॉनची निर्मिती 40 हजार लिटर होत होती. आता ती 500 कोटी लिटर होत आहे. त्याचा फायदा शेतकर्यांना झाला आहे. विकसित भारत बनवण्यासाठी महिलांची भूमिका मोठी व महत्त्वाची आहे. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले, काँग्रेसने आपल्या 60 वर्षांच्या कारकिर्दीत ‘गरिबी हटाव’चा नारा दिला व सत्ता उपभोगली. आम्ही दहा वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. 80 कोटी लोकांना रेशन दहा वर्षे मोफत देण्यात आले. आपन येणाऱ्या काळात देखील मोठा विकास करणार असल्याचे ते म्हणाले. Narendra Modi
हे सरकार रस्ते, रेल्वे, विमानतळ याच्या विकासासाठी खर्च करत आहे. काँग्रेस सरकारने साठ वर्षांत रस्ते, रेल्वेसाठी जेवढा खर्च केला, तेवढा खर्च रस्ते व रेल्वे विकासासाठी आमच्या सरकारने एक वर्षात केला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.