माझं कुंकू-माझा देश! भारत-पाक सामन्याला ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन, भाजपवर निशाणा…

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच आशिया कपमध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. आता या सामन्याच्या दिवशीच शिवसेना ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे.

पक्षाने या सामन्याच्या दिवशी महिला आघाडीकडून ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.
राऊतांनी थेट भाजपवर हल्लाबोल करत “एका बाजूलापाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असल्याचं सरकार सांगतं, तर दुसऱ्या बाजूला अबुधाबीमध्ये पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळला जातोय. खून आणि क्रिकेट एकत्र कसे? यावर भाजप, संघ आणि विश्व हिंदू परिषद यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला आघाडी 14 सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरणार असून ‘सिंदूर के सन्मान में, शिवसेना मैदान में’ या घोषणेसह आंदोलन होणार आहे.
या आंदोलनात मोदींना सिंदूर पाठवण्याचे अभियानही राबवले जाणार आहे. हा सामना म्हणजे देशद्रोह आहे. भाजपच्या नेत्यांची पोरं अबुधाबीला सामना बघायला जाणार आहेत, जय शाह क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत, आणि दुसरीकडे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो नाही, हिंदुत्वाची खरी भूमिका आम्हीच घेतली आहे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
राऊतांनी ट्विट करतही सरकारवर निशाणा साधला. त्यांनी लिहिलं – “पहलगाव हल्ल्यात 26 मातांच्या आणि भगिनींच्या कुंकवाचा रंग पुसला गेला, तो आक्रोश आजही थांबलेला नाही. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. तरीही भारत-पाकिस्तान सामना खेळला जातोय. हा आमच्यासाठी असह्य आहे.