मुंबई-पुणे प्रवास महागणार; एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये 1 एप्रिलपासून ‘इतक्या’ रुपयांची वाढ…!

पुणे : नव्या आर्थिक वर्षात नागरिकांच्या खिशाला अनेक मार्गांनी चटका बसू शकतो. त्यातलाच एक मार्ग ठरणार आहे रस्ते प्रवासादरम्यान येणारा टोल . वाहनधारकांसाठी ही बातमी महत्त्वाची , आता मुंबई पुणे एक्स्प्रेसवे टोल दरात वाद करण्यात आली आहे. या दरवाडीमुळे एप्रिल आणि मे मध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांना ऐहिक रक्कम टोलसाठी खर्च करावी लागणार आहे. एकीकडे टोल कधी बंद होणार अशी चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र टोल दरात वाढ करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 1 एप्रिल 2023 पासून द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी 18 टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, 2023 मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. याआधी 1 एप्रिल 2020 मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र 1 एप्रिल 2023 ला लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील, असं एमएसआरडीसी कडून सांगण्यात आले आहे.
पुणे मुंबई या दोन शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ कायम चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा यावर प्रशासनाकडे प्रश्न विचारले जातात. मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. सुविधा पुरवल्या जात नाहीत. मात्र टोल वाढ नित्यनियमाने केली जाते. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा 50 ते 70 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.