पत्नीला 4 तास ‘कोंबडा’ बनवलं, तलवारीचा धाक दाखवला अन् माहेरी जाऊन चाकूने हल्ला; मुंबईतील विकृत पतीचं थरकाप उडवणारं कांड


मुंबई : प्रेम, विश्वास आणि सुरक्षिततेचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या वैवाहिक नात्यालाच काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. पत्नीला शिक्षा देण्याच्या नावाखाली एका पतीने क्रौर्याचा असा कळस गाठला की, त्याची माहिती समोर येताच पोलिसही हादरले. आधी पत्नीला बेदम मारहाण, नंतर तब्बल चार तास ‘कोंबडा’ बनून बसण्याची शिक्षा, हातात तलवार घेऊन जीवे मारण्याच्या धमक्या आणि अखेर माहेरी जाऊन चाकूने हल्ला… या संपूर्ण प्रकाराने मुंबईत खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज सय्यद नावाच्या आरोपीने घरगुती वादानंतर पत्नीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला घरातच कोंडून ठेवत हातात तलवार घेऊन जीव घेण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला सलग चार तास ‘कोंबडा’ बनून बसण्यास भाग पाडले. शारीरिक वेदना आणि मानसिक छळ सहन करत असताना तिने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट माहेरी धाव घेतली. मात्र, तेथेही तिचा पाठलाग सुरूच राहिला.

माहेरी पोहोचल्यानंतरही आरोपीचा संताप शांत झाला नाही. पत्नीच्या मागावर असलेला अरबाज सय्यद तिच्या माहेरी पोहोचला आणि तेथेही गोंधळ घालत तिला लक्ष्य केल्याचा आरोप आहे. याच दरम्यान त्याने पत्नीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. जखमांमुळे शरीरावर टाके घालावे लागल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. आरसीएफ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर त्याच्याविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. अटक करण्यात आलेला अरबाज सय्यद हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरोधात यापूर्वीच विविध स्वरूपाचे तब्बल 19 गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

सध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!