बारामतीत मोदी येणार अन् राऊतांनी टाकला ‘तो’ बॉम्ब; पवारांशी मैत्रीचा उल्लेख करत थेट मोठा दावा


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख आणि निमंत्रण यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानाने या चर्चेला वेगळंच वळण मिळालं आहे. मोदी बारामतीत का येत आहेत, यावर भाष्य करताना राऊत यांनी नरेंद्र मोदी हे शरद पवारांचे ‘जुने मित्र’ असल्याचं म्हटलं. त्यामुळे मोदी-पवार यांच्या राजकीय संबंधांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार यांच्या निमंत्रणावरून नरेंद्र मोदी बारामतीत येत आहेत. मोदी बारामतीत येणार आहेत, त्याबाबतचा प्रश्न पवारांनाच विचारा, असं राऊत म्हणाले. सुनेत्रा पवारांच्या निमंत्रणावरून मोदींनी बारामतीत यावं का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मोदी आता आपल्या जुन्या मित्रांना भेटत असल्याचा दावा करत राऊत यांनी त्यांच्या राजकीय भवितव्यावरही भाष्य केलं.

मोदींचा सत्तेतील ‘अखेरचा काळ’ सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केला. जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत नरेंद्र मोदी देशाच्या सत्तेत असतील की नाही, याबाबत शंका असल्याचं ते म्हणाले. मोदींसोबत केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनाही जावं लागणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. मात्र, हे राऊत यांचे राजकीय दावे असून त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

एमपीएससी आंदोलनावरून शिंदे गटाला लक्ष्य

पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिंदे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर यांना झालेल्या विरोधावरूनही राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. विद्यार्थ्यांनी ओमराजेंना विरोध करत ‘गद्दार’च्या घोषणा दिल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे गटासोबत गेलेल्या नेत्यांना पैसे किंवा पोलिसांची सुरक्षा मिळू शकते; मात्र प्रतिष्ठा मिळू शकत नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

दुष्काळात दिल्लीच्या फेऱ्या का?

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरूनही राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं. शिंदे हे अमित शाह यांच्या भेटीसाठी वारंवार दिल्लीला जात असल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, नागरिकांचे प्रश्न आहेत आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. अशा वेळी राज्यकर्त्यांनी दिल्लीच्या फेऱ्या करण्याऐवजी महाराष्ट्रात राहून दुष्काळग्रस्त भागात जावं, अशी भूमिका राऊत यांनी मांडली.

विधान परिषदेच्या एका जागेसाठी दिल्लीमध्ये जाऊन भेटीगाठी घेण्याची वेळ आली आहे, असा आरोप करत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रासमोर अनेक गंभीर प्रश्न असताना राजकीय नेत्यांनी राज्यातील परिस्थितीला प्राधान्य द्यायला हवं, असंही ते म्हणाले.

दोन जागांवर ठाकरे गटाची तयारी

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या भूमिकेचाही राऊत यांनी खुलासा केला. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जागांवर ठाकरे गट निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, या दोन्ही ठिकाणी होणारी लढत ‘मैत्रीपूर्ण’ असेल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

एकीकडे मोदींचा बारामती दौरा चर्चेत असताना दुसरीकडे राऊत यांनी मोदी-पवार संबंध, शिंदे गट आणि आगामी विधान परिषद निवडणुकीवरून केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला नवे मुद्दे मिळाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!