मेट्रो तयार, सुरक्षा मंजुरीही मिळाली; तरी पुणेकरांचा प्रवास लांबणीवर, हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाबाबत मोठी अपडेट


पुणे : पीएमआरडीएच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेतील माण ते बालेवाडी या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, या 12 किलोमीटर मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) अंतिम सुरक्षा मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे हा मार्ग प्रवासी सेवेसाठी सज्ज असतानाही प्रत्यक्ष सेवा सुरू होण्यासाठी पुणेकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.

माण ते बालेवाडी या मार्गावरील तांत्रिक कामे आणि आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. 23 जुलै रोजी CMRSकडून या मार्गाला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती आहे. सामान्यतः सुरक्षा मंजुरीनंतर काही दिवसांत मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू केली जाते. मात्र, या मार्गाबाबत उद्घाटनाची तारीख अद्याप निश्चित नसल्याने सेवा सुरू होण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याची प्रतीक्षा?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मेट्रोच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले आहे. पंतप्रधानांचा संभाव्य पुणे दौरा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने उद्घाटनाची तारीख त्यानुसार निश्चित होण्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही मेट्रो सेवा सुरू होण्यास आणखी दीड महिन्याचा विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऑनलाइन उद्घाटनाची मागणी

हिंजवडी हा पुण्यातील प्रमुख आयटी हब असल्याने दररोज मोठ्या संख्येने कर्मचारी या मार्गावरून प्रवास करतात. वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या आयटी कर्मचाऱ्यांनी आणि ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ने मेट्रो सेवा लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी पुण्यातील काही मेट्रो मार्गांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले होते. मग हिंजवडी मेट्रोचेही व्हर्च्युअल उद्घाटन करून प्रवासी सेवा तातडीने सुरू का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मनुष्यबळ तैनात, वेतन सुरू; सेवा मात्र बंद

मेट्रोच्या 12 स्थानकांवर आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून, कर्मचाऱ्यांचे वेतनही सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षा प्रमाणपत्र मिळूनही मेट्रो सेवा सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. राजकीय कार्यक्रमाच्या वेळेपेक्षा पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणे अधिक महत्त्वाचे नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!