मस्साजोग निवडणुकीचा निकाल जाहीर; संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, निवडणुकीत मोठा उलटफेर…

बीड : बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीमध्ये ८४ टक्के मतदान झाले असून आज सकाळी दहा वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सरपंच पद रिक्त झाले होते.

त्यानंतर ही निवडणूक झाली असून यामध्ये आश्विनी देशमुख यांच्यासमोर स्वरूपानंद देशमुख यांनी आव्हान निर्माण केलेले होते. आज झालेल्या मतदानात गावातील २ हजार ८४ मतदारांपैकी १ हजार ७४४ मतदारांनी आपला हक्क बजावला.
आता समोर आलेल्या निकालानुसार संतोष देशमुखांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मस्साजोग ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांना कौल दिला आहे. ९२ मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले आहेत. तर दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे.

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे हे महत्त्वाचे पद रिक्त झाले होते. गावातील राजकीय वातावरण या घटनेमुळे ढवळून निघाले होते. संतोष अण्णांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. ही जागा रिक्त झाल्याने प्रशासनाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता.

गावातील एका गटाची आणि देशमुख कुटुंबाची अशी भावना होती की, संतोष अण्णांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध पार पडावी. मात्र, स्वरूपानंद देशमुख यांनी माघार न घेता निवडणुकीला सामोरे जाण्याचा पवित्रा घेतल्याने प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. ७ एप्रिल २०२६ पासून या रिक्त जागेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, जी जिल्ह्याभरातील ८८ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचा एक भाग होती.
जिल्हा प्रशासनाच्या नियोजनानुसार २८ एप्रिल २०२६ रोजी या पदासाठी शांततेत मतदान पार पडले. आज, २९ एप्रिल रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि काही वेळातच निकालाचे चित्र स्पष्ट झाले. स्वरूपानंद देशमुख यांनी मिळवलेल्या मतांच्या जोरावर अश्विनी देशमुख यांच्यावर विजय मिळवत सरपंचपदाची खुर्ची मिळवली. या निकालाने गावात नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात केली आहे.