शेतातून विवाहित महिलेचे अपहरण; रात्रभर अत्याचार आणि मारहाण, बीड जिल्हा हादरला

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शेतात काम करत असलेल्या एका विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला नेहमीप्रमाणे शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या काही आरोपींनी तिच्यावर हल्ला केला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिला जबरदस्तीने उचलून नेत अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
याच प्रकरणात पुढे इतर आरोपीही सहभागी झाले असून पीडितेला रात्रभर मारहाण करण्यात आली तसेच एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. पहाटेच्या सुमारास तिला गंभीर अवस्थेत निर्जन शेतात टाकून आरोपी फरार झाले.

घटनेनंतर पीडित महिला घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केली. अखेर ती हातपाय बांधलेल्या आणि गंभीर जखमी अवस्थेत शेतात आढळून आली. तात्काळ तिला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध अपहरण, अत्याचार आणि मारहाण या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.