महिनाभरापूर्वी लग्न, पण पत्नीचं वागणं संशयास्पद; मोबाईल चेक करताच धक्कादायक सत्य समोर, नवरदेवाला फुटला घाम

धाराशिव : महिनाभरापूर्वी मोठ्या थाटामाटात झालेलं लग्न, नव्या आयुष्याची स्वप्नं आणि सुखी संसाराची आशा… मात्र अवघ्या 30 दिवसांतच एका तरुणाच्या आयुष्यात धक्कादायक वळण आलं. पत्नी माहेरी गेल्यानंतर तिच्या मोबाईलमधून समोर आलेल्या माहितीनंतर आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठले.

धाराशिव शहरातील भाग्यनगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला. शिवराज पाटील (वय 28) यांचा 13 मे रोजी शुभांगी उर्फ साक्षी मच्छिंद्रनाथ वारले (रा. वाघी, जि. निजामाबाद, तेलंगणा) हिच्याशी विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर पत्नीचे वर्तन संशयास्पद असल्याचे पती आणि कुटुंबीयांच्या लक्षात येऊ लागले.
याबाबतची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर पत्नीच्या काही नातेवाईकांनी घरी येऊन तिची समजूत काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तिला काही दिवसांसाठी माहेरी घेऊन जात असल्याचे सांगून ते निघून गेले.

मात्र, त्यानंतर घरातील 17 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे उघड झाले. याचदरम्यान बेडरूममध्ये उशीखाली राहिलेला पत्नीचा मोबाईल पतीच्या हाती लागला.

मोबाईलमधील फोटो आणि चॅट्स तपासल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित महिलेने यापूर्वीही इतर तरुणांशी विवाह केल्याचे फोटो आढळल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच विवाह जुळवणे आणि पैशांच्या व्यवहारांबाबतचे काही संभाषणही मोबाईलमध्ये आढळल्याचे सांगण्यात आले.
आपली संघटित टोळीकडून फसवणूक झाल्याचा संशय आल्याने शिवराज पाटील यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.