दौंड तालुक्यातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मंगेश फडके यांचे निधन; शेतकरी प्रश्न व दारुव्यसन मुक्तीचे कार्यात त्यांचे भरीव कार्य…

उरुळीकांचन : दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील नदीकाठचे हातवळ गाव येथील तरुण कार्यकर्ते मंगेश फडके यांचे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने हातवळ गावासह दौंड तालुक्यातील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मंगेश फडके यांनी हातवळण शाळा व्यवस्थापन समिती तसेच तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदापासून आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पुढे त्यांनी प्रहार संघटनेशी जोडले जात सामाजिक कार्याला प्राधान्य दिले. प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांच्याशी त्यांचे आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते.

दीन-दुबळ्यांसाठी सातत्याने प्रयत्न
दौंड तालुक्यातील गरजू, निराधार आणि दीन-दुबळ्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मंगेश फडके सातत्याने प्रयत्नशील होते. विशेषतः निराधार मातांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.


शासकीय योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच विविध शासकीय शिबिरांचे आयोजन करण्यावरही त्यांचा भर होता. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांना मिळावा, यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला.
प्रहार संघटनेचे मोठे नुकसान
मंगेश फडके यांच्या निधनामुळे दौंड तालुक्यात प्रहार संघटनेने एक सक्रिय आणि उमदे कार्यकर्ते गमावले आहेत. सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या त्यांच्या जाण्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी शेतकरी प्रश्नांसह दारु व्यसन मुक्ती कार्यातही समाजात मोठी जनजागृती करुन त्यांनी व्यसनमुक्तीसाठी भरीव कार्य उभे केले आहे.
अशा तरुण वयातच त्यांचे निधन झाल्याने हातवळ गावानेही एक उभरते नेतृत्व गमावले आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना आधार देणाऱ्या मंगेश फडके यांच्या निधनाबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.