मंदार किवळे रक्तबंबाळ अवस्थेत चालत आला अन् कोसळला; हल्लेखोरांचे शेवटचे शब्द अन् सहा आरोपींची नावे उघड


पुणे : पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर मंदार मारुती किवळे (वय ३५) याच्यावर सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. २५) दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी आधी पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळी न सुटल्याने त्यांनी कोयत्याने मंदारवर वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी मंदारवर सपासप वार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, घटनेतील प्रत्यक्षदर्शीने हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

‘आम्ही कात्रजचे, नादी लागायचं नाही’

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, दोन दुचाकींवरून आलेल्या तरुणांपैकी एका दुचाकीवर तिघे, तर दुसऱ्या दुचाकीवर दोघे होते. हल्ला केल्यानंतर जाताना त्यांनी मागे वळून पाहत ‘आम्ही कात्रजचे, नादी लागायचं नाही’ असे म्हटले. त्यानंतर गंभीर जखमी झालेला मंदार रक्तबंबाळ अवस्थेत काही अंतर चालत आला आणि खाली कोसळला.

प्रत्यक्षदर्शी आणि इतर नागरिकांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बोलण्याच्या स्थितीत नव्हता. त्याने केवळ आपले नाव मंदार किवळे आणि आपण कात्रज येथे राहत असल्याचे सांगितले. आरोपींच्या हातात कोयते असल्याचेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

सहा आरोपींची नावे समोर

या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींची नावे निष्पन्न केली आहेत.

1. अक्षय सुभाष चव्हाण (वय २०)

2. अमोल रामचंद्र चव्हाण (वय ४८)

3. स्वप्निल बाजीराव गवळी (वय २८)

4. ओंकार संतोष पवार (वय १८)

5. सूरज साधू मालेकर (वय २२)

6. एक अल्पवयीन मुलगा

भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट रचल्याची माहिती

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, शुभमचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण याने मंदार किवळेवर हल्ला करण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. त्याने इतर आरोपींना सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणल्याची माहिती आहे. यासाठी अक्षयने १२ ते १५ तरुणांना एकत्र केले होते, असेही सांगण्यात येत आहे.

भावाच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने अक्षयने मंदारला लक्ष्य केल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे. भावाच्या मृत्यूनंतर बदला घेण्याची शपथ घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

तुरुंगातून बाहेर येताच मंदारवर पाळत

मंदार किवळे हा चार ते पाच दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. तो बाहेर आल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यानंतर एक ते दोन दिवसांपासून आरोपी त्याच्यावर पाळत ठेवून असल्याचे समोर आले आहे. मंदार न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर येथे आला असताना आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!