कंत्राटदारांना फडणवीसांचा मोठा दिलासा! थकीत देयके मार्च २०२७ पर्यंत मिळणार; आंदोलनही स्थगित..

मुंबई : राज्यातील सरकारी विभागांकडे प्रलंबित असलेली कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके मार्च २०२७ अखेरपर्यंत अदा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
तसेच निधीची उपलब्धता असल्याशिवाय यापुढे कोणतीही निविदा काढली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनने हिवाळी अधिवेशनादरम्यान नियोजित केलेले आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शासकीय कंत्राटदारांची विविध सरकारी विभागांकडील थकीत देयके, जलजीवन मिशनची प्रलंबित बिले आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणी आणि विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला फेडरेशनचे कार्याध्यक्ष प्रवीण उंबरकर, विदर्भ विभागीय संघटक सुबोध सरोदे, जनरल सेक्रेटरी नितीन साळवे, मानद संचालक संजय मैंद, उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, संचालक इरशाद नवाब यांच्यासह अन्य कंत्राटदार उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केल्याची माहिती फेडरेशनचे संचालक तथा पुणे जिल्हाध्यक्ष रवींद्र भोसले यांनी दिली. तसेच या निर्णयाला सर्व कंत्राटदारांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आदिवासी विकास विभागाची थकीत बिले मार्चपर्यंत देण्याचा प्रयत्न
बैठकीत आदिवासी विकास विभागाकडील प्रलंबित देयकांचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निधी उपलब्ध करून देताना अडचणी येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मात्र, हिवाळी अधिवेशनात जास्तीत जास्त निधीची तरतूद करून डिसेंबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत प्रलंबित देयके अदा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
जलजीवन मिशनची थकबाकीही मिळणार
जलजीवन मिशनअंतर्गत कामे पूर्ण करूनही त्यांची देयके मिळत नसल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. जलजीवन मिशनची देयके अदा करण्याचे नियोजन यापूर्वीच करण्यात आले असून, उर्वरित थकबाकीही लवकरात लवकर देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी स्वतंत्र निधीची मागणी
बैठकीत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. राज्यातील सर्व शासकीय विभागांमध्ये या अभियंत्यांसाठी एकच नोंदणी व्यवस्था असावी, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांअंतर्गत मंजूर होणारी एक कोटी रुपयांपर्यंतची कामे त्यांच्यासाठी राखीव ठेवावीत, तसेच त्यांच्या कामांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अशा मागण्या फेडरेशनच्या वतीने करण्यात आल्या.
या मागण्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिल्याची माहिती पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी दिली.
