माळेगावच्या प्रचाराची रणधुमाळी आज थंडावणार, रविवारी मतदान, कोणाचं पारडं जड? निकालाकडे राज्याचे लक्ष…

बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याचे कारण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या निवडणुकीत उतरले असून ब वर्गातून ते उभा आहेत. तसेच ते चेअरमन होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गेली काही दिवस माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात घोंगडी बैठका, जाहीर सभांच्या माध्यमातून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. गेली आठ ते दहा दिवस आरोप प्रत्यारोप झाले असले, तरी सभासद कोणाला कौल देणार याची उत्सुकता लागली आहे. थेट उपमुख्यमंत्र्यांनीच कारखान्याच्या अध्यक्षपदाची दावेदारी जाहीर केल्याने या निवडणुकीला अधिकच महत्व प्राप्त झाले.

माळेगाव साखर कारखान्याची श्री निळकंठेश्वर पॅनलची सांगता सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे जाधवराव कॉम्प्लेक्स शनी मंदिर समोर नीरा-बारामती रोड माळेगाव बुद्रुक येथे ५ वाजता होणार आहे. तसेच चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलची सांगता सभा सायंकाळी पाच वाजता माळेगांव नगरपंचायत कार्यालयासमोर होणार आहे.

शरद पवार यांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलची सांगता सभा खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी २.३० वाजता शिवमंगल कार्यालय माळेगांव बुद्रुक माळेगांव कारखाना रोड या ठिकाणी होणार आहे. रविवारी यासाठी मतदान होणार असून याठिकाणी जोरदार पैशाचा पाऊस पडणार असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी गेल्या आठ दिवसांपासून याठिकाणी तळ ठोकल्याने वातावरण तापले आहे. त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे सभासद नेमकं कोणाच्या मागे उभा राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले असून याठिकाणी धक्कादायक निकाल लागेल, असेही दबक्या आवाजात म्हटले जात आहे.
