अजित पवार गटासोबत जाणार की नवा राजकीय डाव? सुप्रिया सुळेंच्या ‘राष्ट्रवादी एकत्रच’ विधानाने खळबळ!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मात्र, या चर्चेवर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानामुळे आता राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. “राष्ट्रवादी एकत्रच आहे, आमचा पक्ष एकत्रच आहे,” असं म्हणत सुळे यांनी थेट पक्षाच्या अस्तित्वाचा आणि अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा संदर्भ देत शरद पवार हे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य असल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, चुकीच्या पद्धतीने पक्ष शरद पवारांकडून काढून घेण्यात आला असून, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. त्यामुळे दोन्ही गटांच्या विलिनीकरणाआधीच “पक्ष नेमका कोणाचा?” हा मूलभूत प्रश्न महत्त्वाचा असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.

पक्षाचं संविधान पाहिल्यास शरद पवारांवर अन्याय झाल्याचा दावा करत सुळे यांनी हा पक्ष अधिकाराने आणि न्यायाने शरद पवारांना परत मिळावा, अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची लवकर सुनावणी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


विशेष म्हणजे, पक्ष पुन्हा शरद पवारांकडे आल्यास पुढे काय करायचं, नेतृत्व कोणाकडे द्यायचं किंवा पक्षाची जबाबदारी कोणाला सोपवायची, हा निर्णय शरद पवारच घेतील, असं सुळे यांनी स्पष्ट केलं. आमदार-खासदारांची संख्या नव्हे, तर पक्षाचं संविधान, जिल्हाध्यक्ष आणि अधिकृत कागदपत्रांना महत्त्व असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरही सुळे यांनी सरकारवर टीका केली. विविध प्रश्नांसाठी नागरिकांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचं सांगत, “उपोषण केल्याशिवाय सरकार ऐकतच नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
सुळे यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. विलिनीकरणाची चर्चा प्रत्यक्षात कोणत्या दिशेने जाते आणि सर्वोच्च न्यायालयातील लढाईचा पुढील निकाल काय लागतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.