मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत; विलिनीकरणाच्या चर्चांवर बड्या नेत्याचा मोठा दावा, कारणही सांगितलं

मुंबई : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चांवर मोठे वक्तव्य केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार नसल्याचा दावा त्यांनी करत, सध्या सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा रंगल्या होत्या. मात्र, शिरसाट म्हणाले, “आज कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. विलिनीकरणासाठी असलेल्या अटी-शर्थी दोन्ही बाजूंना मान्य नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र विलीन होण्याची शक्यता नाही.”
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी रुग्णालयातील कामकाजावरही नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील कामांसाठी मोठा निधी खर्च होऊनही अपेक्षित दर्जाचे काम न झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाईचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ठाकरे गटातील सहा खासदारांच्या विलिनीकरणालाही त्यांनी दुजोरा दिला. “ते शिवसेनेचेच होते आणि शिवसेनेतच आले आहेत. त्यांनी पक्ष बदललेला नाही,” असे शिरसाट म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनावर टीका करताना त्यांनी, “पक्षाची रक्षा आधी करा, कार्यकर्त्यांना जपा,” असा टोला लगावला.
