पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विधानपरिषदेसाठी भाजप नेत्याची बंडखोरी, पक्षासमोर नवं आव्हान

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असतानाच भाजपला बंडखोरीचा मोठा धक्का बसला आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने स्वेरी कॉलेजचे संस्थापक बब्रुवाहन रोंगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रोंगे यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. पुणे विभागातील पाच जिल्हे आणि ५८ तालुक्यांमध्ये शिक्षकांसाठी काम केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच सुमारे ३८ हजार शिक्षक मतदारांची नोंदणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र आपले काम पक्षातील वरिष्ठांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवता आले नसल्याची खंत रोंगे यांनी व्यक्त केली. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अनेक वर्षे काम करत असल्याने त्यांच्या न्यायासाठीच अपक्ष म्हणून मैदानात उतरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर नव्हे तर पसंतीक्रमाने होत असल्याने आपल्यावर पक्षाकडून दबाव येणार नाही, असा विश्वासही रोंगे यांनी व्यक्त केला. कितीही दबाव आला तरी आपली उमेदवारी निश्चित असून आपण विजय मिळवणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गटानेही दावा केला असून मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण आणखी रंगण्याची शक्यता आहे.
अमरावतीतही भाजपला बंडखोरीचा सामना
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातही भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोहरादेवीचे महंत आणि पेशाने प्राचार्य असलेले भाजपचे सुनील महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समोर आले आहे.
सुनील महाराज सोमवारी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडून होत असलेल्या बंडखोरीमुळे अमरावती शिक्षक मतदारसंघातही महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
