केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणाला मोठं वळण; तीन आरोपींचा जामीन फेटाळला, मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथील बहुचर्चित बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील तीन आरोपींचे जामीन अर्ज बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत.
दरम्यान, प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णा गिरी याची पत्नी राणी अण्णा गिरी हिला विशेष तपास पथकाने (SIT) अटक केली आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तासगावकर यांनी माहिती दिली.

केडगाव गर्भपात प्रकरणात आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी नरेंद्र ठाकरे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्याला वगळता इतर आरोपींचे जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत.


या प्रकरणाच्या तपासादरम्यान आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आल्यानंतर विशेष तपास पथकाने राणी गिरी हिच्यावरही गुन्हा दाखल केला. अण्णा गिरी याच्या राहत्या घरी सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या प्रकारात राणी गिरी हिचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या बेकायदा कृत्यातून मिळणारी रक्कम राणी गिरी हिच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच इतर आरोपींच्या बँक खात्यांमधूनही या प्रकरणाशी संबंधित रकमेची देवाणघेवाण झाल्याचे तपासात आढळून आले आहे.
उपलब्ध पुरावे आणि तपासातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे राणी गिरी हिला मंगळवारी अटक करण्यात आली. त्यानंतर बुधवारी तिला दौंड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने राणी गिरी हिला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले डॉ. सुमंत शितोळे (रा. पारगाव, ता. दौंड), एजंट बापू जांभले (रा. वासुंदे, ता. दौंड) आणि सचिन कदम (रा. बोरीपार्धी, ता. दौंड) यांच्या जामीन अर्जावर बारामती सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत.
या प्रकरणातील आरोपींना गर्भलिंग निदानाचे यंत्र पुरवल्याचा आरोप असलेल्या नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली) याला मात्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेला डॉ. मंदार माळी (रा. किकवी, ता. भोर) याचा अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे.
सध्या या प्रकरणातील डॉ. अतुल जाधव (वाघोली), डॉ. सुंदरम कदम (उरुळी कांचन), डॉ. संगीता गायकवाड (केडगाव), सदिच्छा शिंदे, अमित टेंगले आणि सचिन कदम हे आरोपी येरवडा कारागृहात आहेत. या प्रकरणातील पुढील तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे.