ठाकरे गटात मोठी फूट पडणार? सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; दिल्लीतील बैठकींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू असून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना वेग आल्याचे मानले जात आहे.

७ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना ठाकरे गटातील काही खासदारांसोबत त्यांची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत आगामी राजकीय समीकरणे, केंद्रातील प्रतिनिधित्व आणि भविष्यातील राजकीय भूमिका यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून खासदार श्रीकांत शिंदे हे ठाकरे गटातील काही खासदारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती. दिल्लीत अनेक वेळा स्वतंत्र बैठका झाल्यानंतर काही खासदारांची एकत्रित चर्चादेखील झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही काही महत्त्वाच्या बैठका झाल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास ठाकरे गटातील एका खासदाराला मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील एका खासदाराचे नाव यासाठी चर्चेत असून इतर काही खासदारांनाही विविध महत्त्वाच्या पदांवर संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

सध्या लोकसभेत ठाकरे गटाचे नऊ खासदार आहेत. त्यापैकी मुंबईतील दोन खासदार वगळता उर्वरित सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नेतृत्वातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आणखी वेग आला असून ठाकरे गटातील संभाव्य फोडीबाबत चर्चांना उधाण आले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठका आणि त्यानंतरच्या राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आता या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाची अधिकृत भूमिका काय असणार आणि आगामी काही दिवसांत कोणते राजकीय निर्णय घेतले जाणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!