मोदी सरकारमध्ये मोठा फेरबदल होणार? गडकरींची ट्रान्स्फर, नव्या चेहऱ्यांना संधी; महाराष्ट्रातून कोण?


नवी दिल्ली : भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल झाल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजधानी दिल्लीत सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असून, या विस्तारात अनेक विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2029 मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यातही बदल होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना मंत्रिमंडळात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तर नितीन गडकरी यांच्याकडील विद्यमान खाते काढून त्यांना दुसरे महत्त्वाचे खाते दिले जाऊ शकते. याशिवाय काही जुन्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवून तब्बल 16 ते 17 नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

मोदींची खासदारांसोबत ‘चाय पे चर्चा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून खासदारांशी संवाद वाढवला आहे. काही खासदारांसोबत ‘चाय पे चर्चा’ही सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या भेटीगाठींचा संबंध आगामी मंत्रिमंडळ विस्ताराशी जोडला जात आहे.

2027 मध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील निवडणुका भाजपसाठी विशेष महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यानंतर 2029 मध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने त्याआधी केंद्रातील मंत्रिमंडळाची नव्याने आखणी केली जाण्याची शक्यता आहे.

टॉप मंत्रालयांमध्येही बदलाची शक्यता

मोदी सरकारमधील काही महत्त्वाच्या मंत्रालयांमध्येही फेरबदल होण्याची शक्यता आहे. हा बदल संबंधित मंत्र्यांचा परफॉर्मन्स खराब असल्यामुळेच केला जाईल असे नाही. इतर नेत्यांना संधी देणे आणि महत्त्वाच्या खात्यांमध्ये नव्या पद्धतीने कामाला गती देणे, हा या फेरबदलामागचा उद्देश असू शकतो.

चांगली कामगिरी करणाऱ्या काही मंत्र्यांनाही दुसरे खाते दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच काही मंत्र्यांकडे असलेली अतिरिक्त मंत्रालये इतर नेत्यांमध्ये विभागली जाऊ शकतात.

12 मंत्रिपदे अद्याप रिक्त

केंद्र सरकारमध्ये सध्या अनेक मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त मंत्रालयांची जबाबदारी आहे. तब्बल 14 मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खात्यांचा अतिरिक्त कार्यभार असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची कमाल संख्या 81 मंत्री इतकी असू शकते. सध्या मोदी सरकारमध्ये 69 मंत्री असल्याने 12 मंत्रिपदे अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे आगामी विस्तारात या रिक्त जागा भरण्यासोबतच विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांची फेररचना होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विस्तार?

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार, जन्माष्टमीच्या आसपासही विस्तार होऊ शकतो.

या विस्तारात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यांना प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता या राज्यांना अधिक महत्त्व दिले जाऊ शकते.

मात्र मंत्रिमंडळ विस्तारात नेमक्या कोणत्या नेत्याला संधी मिळणार आणि कोणत्या विद्यमान मंत्र्यांची खाती बदलणार, हे अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!