पुण्यात गणपती मिरवणुकीत DJचा दणदणाट थांबणार? लेझरवरही बंदी; नियम तोडणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा थेट इशारा


पुणे : गणेशोत्सवाच्या जल्लोषाला सुरुवात होण्यापूर्वीच पुणे प्रशासनाने ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेतली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात लेझर लाईटचा वापर करता येणार नसून, DJ आणि ध्वनीक्षेपकाच्या आवाजाबाबत न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कोणतीही हयगय न करता गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिला आहे.

पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सवात DJचा वाढता आवाज, कर्णकर्कश ध्वनी आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाचा मुद्दा यंदा पुन्हा चर्चेत आला आहे. सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाची मागणी लावून धरली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा दाखला देत गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्याची भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेला अनेक पुणेकरांनीही पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, प्रशासनाने गणेश मंडळांसोबत बैठका घेऊन उत्सवादरम्यान लागू असलेल्या नियमांची माहिती दिली आहे. त्यामुळे मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांमध्ये ध्वनीमर्यादा पाळावी लागणार आहे. DJ, ध्वनीक्षेपक किंवा इतर ध्वनिवर्धकांचा वापर करताना न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. उत्सवाच्या नावाखाली नियम मोडण्याची मुभा कोणालाही दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, पुणे शहरात यंदाही लेझर लाईटवर बंदी कायम राहणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात लेझरमुळे नागरिकांच्या आरोग्यावर तसेच वाहतूक आणि सार्वजनिक सुरक्षेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा विचार करून हा निर्णय लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डूडी यांनी सांगितले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न आता आणखी एका पातळीवर पोहोचला आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील रहिवासी शरद केळकर यांनी वाढत्या ध्वनीप्रदूषणाविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यात उत्सवाचा जल्लोष कायम असला, तरी आवाजाच्या मर्यादेचा भंग करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. गणेश मंडळांनी परंपरा आणि उत्साह जपत न्यायालयीन आदेशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र नियम झुगारून DJचा दणदणाट किंवा ध्वनीप्रदूषण केल्यास ‘पहिले समजावून सांगू, नंतर कारवाई’ नव्हे, तर थेट गुन्हा दाखल केला जाईल, अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!