MPSC उमेदवारांसाठी मोठा दिलासा! आता वर्षातून 3 वेळा होणार पूर्व परीक्षा; 2027 पासून नवी परीक्षा पद्धती लागू

मुंबई : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला असून, 2027 पासून नवीन परीक्षा प्रणाली लागू केली जाणार आहे. या बदलांमुळे उमेदवारांना अधिक संधी मिळणार असून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्री होणार आहे.

नवीन निर्णयानुसार, MPSC ची पूर्व परीक्षा आता वर्षातून एकदाच नव्हे तर जास्तीत जास्त तीन वेळा घेतली जाणार आहे. आतापर्यंत एका दिवसाच्या कामगिरीवर संपूर्ण वर्षाचे भविष्य ठरत होते. मात्र आता उमेदवारांना एकाच वर्षात अनेक वेळा पूर्व परीक्षा देता येणार असल्याने अपयशानंतरही पुन्हा संधी मिळणार आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा तीन वेळा आयोजित केल्या जातील. मात्र मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच वर्षातून एकदाच होणार आहे.

विशेष म्हणजे, वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही पूर्व परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार त्या वर्षातील मुख्य परीक्षेसाठी पात्र मानले जाणार आहेत. त्यामुळे एका प्रयत्नातील अपयशामुळे संपूर्ण वर्ष वाया जाणार नाही.

मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय हटवला
नवीन परीक्षा पद्धतीत राज्य सेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. यामुळे अतिरिक्त दोन पेपरांचा भार कमी होणार असून सर्व उमेदवारांसाठी समान स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल.
ऑनलाइन CBT परीक्षा आणि नॉर्मलायझेशन लागू
एमपीएससीच्या परीक्षा आता पारंपरिक ओएमआर पद्धतीऐवजी संगणकाधारित ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल आणि निकालही कमी कालावधीत जाहीर करता येतील.
पूर्व परीक्षा विविध सत्रांमध्ये होणार असल्याने सर्व उमेदवारांना समान न्याय मिळावा यासाठी नॉर्मलायझेशन पद्धती लागू करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत वेगवेगळ्या सत्रांतील प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेतील फरक लक्षात घेऊन गुणांचे समानीकरण केले जाईल.
एमपीएससीच्या परीक्षा नियंत्रक तथा सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधारित परीक्षा प्रणाली 2027 पासून लागू होणार असून मुख्य परीक्षेसाठी पात्रता निश्चित करण्याची सविस्तर कार्यपद्धती आयोग लवकरच स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करणार आहे.