राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप? कार्यकारिणीतून पटेल-भुजबळ-तटकरेंची हकालपट्टी; सुनेत्रा पवारांचं मध्यरात्री स्पष्टीकरण


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची नावे अचानक गायब झाल्याने राष्ट्रवादीत मोठा अंतर्गत संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या हातात गेल्यानंतर हा पहिलाच मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आल्याचे समोर आले. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय चेहरा राहिलेले प्रफुल पटेल यांचे नाव यादीत नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील रणनीतीत पटेल यांची महत्त्वाची भूमिका मानली जात होती. तरीही त्यांना नव्या यादीत स्थान न मिळाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

यासोबतच महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरे यांचेही नाव सरचिटणीस पदावरून वगळण्यात आले आहे. तर ओबीसी चेहरा मानले जाणारे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या अनुभवी नेत्यांची नावेही यादीत नसल्याने पक्षात मोठे फेरबदल सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दरम्यान, या नव्या कार्यकारिणीत सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि जय पवार यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आल्याने ‘पक्षात पवार कुटुंबाचे वर्चस्व आणखी मजबूत होत आहे का?’ असा सवालही उपस्थित केला जात आहे. यामुळे राष्ट्रवादीत जुनी फळी विरुद्ध नवे नेतृत्व असा संघर्ष उफाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

कार्यकारिणीच्या यादीवरून निर्माण झालेल्या गोंधळानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले. माध्यमांमध्ये फिरत असलेल्या यादीत काही त्रुटी असून त्यामध्ये बदल केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राष्ट्रवादीकडून ही यादी २९ एप्रिल रोजीच केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आल्याचे समोर आल्याने प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे.

राष्ट्रवादीतील या घडामोडींमुळे आगामी काळात पक्षात मोठे राजकीय बदल होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!