मान्सूनबाबत मोठा अपडेट! अखेर महाराष्ट्रात पुढे सरकला; अनेक भागांना यलो अलर्ट

मुंबई : गेल्या दोन आठवड्यांपासून दक्षिण कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे स्थिरावलेल्या मान्सूनने अखेर पुढे वाटचाल केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने सोमवारी पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत मजल मारली असून पुढील ४८ तासांत मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्येही त्याचे आगमन होण्यासाठी हवामान स्थिती अनुकूल आहे.

राज्यात सध्या काही ठिकाणी वादळी पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी बहुतांश भागात अद्याप कोरडे हवामान कायम आहे. यंदा ६ जून रोजी तळकोकणात मान्सूनचे आगमन झाले होते. साधारणपणे १५ ते २० जूनदरम्यान राज्यातील बहुतांश भागात मान्सून पोहोचतो. मात्र यंदा जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही.
८ जूनपासून एकाच ठिकाणी स्थिरावलेल्या मान्सूनने अखेर दोन आठवड्यांनंतर पुन्हा प्रगती केली आहे. पुणे आणि अलिबागपर्यंत पोहोचण्याबरोबरच मध्य अरबी समुद्र, तेलंगणा, कर्नाटकच्या उर्वरित भागांसह छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारमधील काही भागांमध्येही मान्सूनने पुढे वाटचाल केली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

दरम्यान, रविवारपासून हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्येही लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांसाठी हवामान विभागाने वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मंगळवारपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती कायम राहू शकते. काही भागांत वादळी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.