दूध भेसळीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; पुणे, अहिल्यानगरसह सहा जिल्ह्यांत धडक छापेमारी, १३ जण अटकेत


पुणे : सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या दूध भेसळ रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, सांगली आणि भिवंडीसह सहा जिल्ह्यांत एकाचवेळी धाड टाकण्यात आली. या कारवाईत सुमारे अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

४५ अधिकाऱ्यांची सहा जिल्ह्यांत एकाचवेळी धाड

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या ४५ सदस्यीय विशेष पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली. मंचर परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आणि या रॅकेटमागील संपूर्ण साखळी उघडकीस आली. त्यानंतर विविध ठिकाणी छापे टाकून १३ आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आले.

शुद्ध दुधात रासायनिक पदार्थांची भेसळ

तपासादरम्यान समोर आलेली भेसळीची पद्धत अत्यंत धक्कादायक आहे. डेअरीमध्ये येणाऱ्या शुद्ध दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात होती. ५०० लिटर दुधात जवळपास ३०० लिटर, तर १,००० लिटर दुधात तब्बल ५०० लिटरपर्यंत भेसळ केली जात असल्याचे उघड झाले आहे. दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यात गंधरहित शॅम्पू, दूध पावडर, विविध रासायनिक पदार्थ आणि पाणी मिसळून बनावट दूध तयार केले जात होते.

नामांकित कंपन्यांनाही पुरवठ्याचा संशय

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे भेसळयुक्त दूध बाजारातील काही नामांकित दुग्धव्यवसायिक आणि कंपन्यांकडे पुरवले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याच दुधापासून तयार होणारे पनीर, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थ गेल्या दोन वर्षांपासून बाजारात विक्रीस येत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आणखी व्यापक करण्यात आला असून, या रॅकेटशी संबंधित इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!