पंजाबराव डखांचा मोठा इशारा! 24 ते 28 जून राज्यात मुसळधार पावसाचा धडाका; अनेक भागांत अतिवृष्टीची शक्यता

पुणे : उशिराने का होईना, अखेर राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, कोकणसह अनेक भागांत पावसाने जोरदार आगमन केले असून येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यातील पावसाबाबत नवा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी जूनच्या अखेरपर्यंत आणि जुलै महिन्यातील काही महत्त्वाच्या तारखांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. तसेच काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
पंजाबराव डख यांच्या मते, 24 ते 30 जूनदरम्यान राज्यातील बहुतांश भागांत चांगला पाऊस पडेल. ज्या ठिकाणी जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली असेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात करण्यास हरकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

तसेच 5 जुलैपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत पाऊस पोहोचेल आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या वेगाने सुरू होतील, असे त्यांनी सांगितले. 2 जुलै ते 20 जुलै या कालावधीत काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता असून पुणे जिल्हा, मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास मदत होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये 27 जूनपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही पावसाचे आगमन होईल, असे त्यांनी सांगितले. पुढील पाच ते सात दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची स्थिती सुधारेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.