राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी! आदिती तटकरे यांचा मोठा निर्णय; नंदुरबारचा दौरा अचानक रद्द

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणावरून राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असून, शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळेही राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. त्यातच काही नेत्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या सगळ्या घडामोडींदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटातील 20 ते 30 आमदार पक्ष सोडू शकतात, असा दावा केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी वेग आला आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन केले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
आदिती तटकरे यांचा नंदुरबार दौरा अचानक बदलला

राष्ट्रवादीतील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे यांच्या दौऱ्यातही अचानक बदल करण्यात आला आहे. त्या सध्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, दिवसभर विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार होत्या. त्यानंतर रात्री उशिरा मुंबईला परतण्याचे नियोजन होते.

मात्र, सुधारित दौऱ्यानुसार आदिती तटकरे दुपारी 4 वाजता नंदुरबारहून जळगावला रवाना होणार आहेत. तेथून विमानाने त्या मुंबईला जाणार असल्याची माहिती आहे. दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईला परतण्याच्या निर्णयामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
आदिती तटकरे यांनाही कार्यालयातून फोन?
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आदिती तटकरे यांनाही फोन करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानंतरच त्यांनी मुंबईला तातडीने रवाना होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या फोनमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पार्थ पवारांची पुण्यात आमदारांसोबत बैठक
दुसरीकडे, पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील जिजाई निवासस्थानी राष्ट्रवादीच्या निवडक आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी आतापर्यंत सात आमदार दाखल झाल्याची माहिती आहे. आमदार शंकर मांडेकर आणि चेतन तुपे हे बैठकीसाठी पोहोचले आहेत. इतर आमदारही बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
या बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. पहिला मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत आमदारांची भूमिका काय आहे? तर दुसरा मुद्दा म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याबाबत आमदारांची तयारी आहे का? याबाबत त्यांची मते जाणून घेतली जाणार असल्याची चर्चा आहे.
मात्र, या बैठकीचा नेमका अजेंडा काय आहे, याबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आदिती तटकरे यांचा दौरा, आमदारांना केले जाणारे फोन आणि पार्थ पवारांची बैठक या घडामोडींमुळे राष्ट्रवादीत पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
