मोठा निर्णय! ‘नकली पनीर’वर महाराष्ट्रात एक वर्षाची बंदी; FDA ची मोठी कारवाई


मुंबई : राज्यातील अन्नभेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दुधाऐवजी वनस्पतीजन्य तेल व इतर दुग्धेतर घटकांपासून तयार होणाऱ्या ‘ॲनालॉग पनीर’वर महाराष्ट्रात एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. या निर्णयानंतर राज्यात फक्त शुद्ध दुधापासून तयार केलेल्या पनीरचीच विक्री करता येणार आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या पनीरच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, काही पनीर पदार्थांच्या किमती वाढू शकतात.

एफडीएने 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यभरातून 308 पनीरचे नमुने तपासले. त्यापैकी 109 नमुने निकृष्ट किंवा भेसळयुक्त आढळले. यामध्ये 79 नमुने दर्जाहीन, तर 30 नमुने थेट आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत स्पष्ट झाले.

तपासादरम्यान अनेक नमुन्यांमध्ये दुधातील नैसर्गिक स्निग्धांशाऐवजी पाम तेल, वनस्पतीजन्य तेल आणि इतर कृत्रिम घटकांचा वापर केल्याचे उघड झाले. हे पदार्थ रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार करून पनीरसारखे दिसतील अशी बनावट केली जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे दुग्धेतर पनीर नियमित खाल्ल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांविरोधातील कारवाई आणखी कठोर करण्यात येणार असून, या निर्णयामुळे ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मोठी मदत होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!