पुण्यात पोलीस आयुक्तांच्या बंगल्यावर मोठा राडा! कर्मचाऱ्याने थेट घुसवली कार, शिवीगाळ करत घातला गोंधळ अन्…


पुणे : पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बदली न मिळाल्याच्या नाराजीतून एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे.

संबंधित कर्मचारी दारूच्या नशेत असल्याची माहिती असून, त्याने बंगल्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांना सुमारे अर्धा तास शिवीगाळ करत जाब विचारल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्याविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

अमोल भिसे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यापूर्वी काही कारणांमुळे त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले. मात्र, त्याला अपेक्षेप्रमाणे बदली मिळाली नसल्याने तो नाराज होता.

याच नाराजीतून त्याने दारूच्या नशेत थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे अधिकृत निवासस्थान गाठले. तेथे पोहोचल्यानंतर त्याने उपस्थित कर्मचाऱ्यांशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बदलीच्या धोरणावर आणि वरिष्ठांच्या कारभारावरही त्याने संताप व्यक्त केल्याची माहिती आहे.

अर्धा तास सुरू होता गोंधळ

पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानीच एका पोलीस कर्मचाऱ्याने गोंधळ घातल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेप्रकरणी अमोल भिसे याच्याविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे आणि दारूच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!