दिवाळीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ? बच्चू कडूंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव : दिवाळीचा सण जवळ येत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. दिवाळीत किंवा दिवाळीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तारासोबतच मोठा खांदेपालट होण्याची शक्यता असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारमधील संभाव्य बदलांबाबत राजकीय चर्चांना नवा रंग आला आहे.
जळगाव दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी राज्यातील आगामी राजकीय घडामोडींवर भाष्य केले. दिवाळीत किंवा त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि मोठे फेरबदल होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अडीच-अडीच वर्षांचा शब्द दिल्याची आठवणही कडू यांनी करून दिली. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा नेमका संदर्भ काय, याबाबत आता विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांनी जळगावचे आमदार किशोर पाटील यांच्या मंत्रिपदासाठीही जोरदार भूमिका मांडली आहे. किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे कडू यांनी सांगितले. गरज पडल्यास किशोर पाटील यांच्यासाठी जोर लावू, असेही त्यांनी स्पष्ट केले.


जळगाव जिल्ह्यातून किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळालेच पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. गरज असेल तर जळगाव जिल्ह्याला दोन मंत्रिपदे द्या, मात्र किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्या, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
किशोर पाटील यांनी सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या असून ते तीन वेळा आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघातील जनतेची इच्छा असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार किंवा खांदेपालटाबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर दिवाळीनंतर नेमके कोणते बदल होणार, कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार आणि विद्यमान मंत्र्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल होणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.