कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय! कोकणातील १५ एकर जमीन ॲमिटी विद्यापीठाला..

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून ॲमिटी विद्यापीठच्या विस्तारासाठी रायगड जिल्ह्यातील भाताण येथे १५ एकर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विस्ताराला मोठी चालना मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्यारितनंद बालवेद शिक्षण संस्था ला मौजे भाताण, ता. पनवेल, जि. रायगड येथील सुमारे १५ एकर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली.
ॲमिटी विद्यापीठात सध्या १८ शाखांमधून विविध शैक्षणिक अभ्यासक्रम चालवले जात असून, येथे पाच हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वाढत्या शैक्षणिक गरजा आणि नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेने अतिरिक्त जमिनीची मागणी केली होती.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, भाताण येथील आकारीपड जमिनीपैकी सुमारे १५ एकर जमीन विशेष बाब म्हणून वर्ग-२ धारणाधिकाराने उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित संस्थेकडून कब्जेहक्काची रक्कमही वसूल केली जाणार आहे.

या जागेवर शैक्षणिक संकुल, खेळाची मैदाने, वसतीगृहे, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर शैक्षणिक सुविधा उभारल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.