केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा उलगडा! सिया-चेतनच्या नात्याची सुरुवात कशी झाली? धक्कादायक माहिती समोर

पुणे : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेने आता कथित हत्येचे गंभीर वळण घेतले असून, तपासातून अनेक बाबी उघड होत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह नोव्हेंबर महिन्यात उदयपूर येथे होणार होता. केतन हा नामांकित बांधकाम व्यावसायिक कुटुंबातील असून एका मोठ्या रिअल इस्टेट कंपनीत संचालक पदावर कार्यरत होता. तर सिया गोयल हिने पुण्यात स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू केला होता.
याच व्यवसायादरम्यान सियाची ओळख चेतन चौधरीशी झाली. दोघांची मैत्री पुढे प्रेमसंबंधात बदलल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, दरम्यान सियाचे लग्न केतन अग्रवाल यांच्याशी ठरले होते आणि दोघांचा साखरपुडाही झाला होता.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात केतन आणि सिया यांचे इंडोनेशियातील बाली येथे प्री-वेडिंग शूटचे नियोजन होते. मात्र, प्रवासापूर्वीच केतनचा पासपोर्ट गहाळ झाल्याने हा दौरा रद्द झाला. याबाबतही पोलिस तपास करत आहेत.

दरम्यान, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतनचा दरीत पडून मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र, तांत्रिक पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि अन्य तपासाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात संशयित म्हणून सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली आहे.
तपास यंत्रणांच्या मते, लोहगड किल्ल्यावर घडलेली घटना अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकते, असा संशय आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आगामी काळात आणखी महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.