‘दुपारनंतर घराबाहेर पडू नका!’ ताशी 80 किमी वेगाने वाऱ्यांचा इशारा; रेड अलर्टदरम्यान मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्राला मोठे आवाहन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे कळकळीचे आवाहन केले आहे. दुपारनंतर अनेक भागांत ताशी 70 ते 80 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, झाडे उन्मळून पडणे, दरडी कोसळणे आणि इतर दुर्घटना घडण्याचा धोका वाढला आहे.

विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून संवेदनशील भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. प्रशासन, पोलीस, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग २४ तास अलर्ट मोडवर काम करत आहेत. मुंबई-पुणे मार्गावरील भूस्खलन, मानखुर्द दुर्घटना आणि विविध ठिकाणच्या पूरस्थितीवर सरकार सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी विशेषतः तरुणांना धबधबे, घाटमाथे आणि पर्यटनस्थळांवर जाणे टाळण्याचे आवाहन केले. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधकाम सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांसाठी विशेष सुरक्षा निर्देश जारी केले आहेत. स्कॅफोल्डिंग, क्रेन, फॉर्मवर्क, सुरक्षा जाळ्या आणि उंचावरील साहित्याची तातडीने तपासणी करून ते सुरक्षित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवामान सुधारत नाही तोपर्यंत उंचावरील कामे आणि लिफ्टिंग ऑपरेशन्स थांबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असल्याने अनावश्यक प्रवास टाळून सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.
