पुण्यातील प्रसिद्ध हॅाटेल वैशाली आणि गुडलक कॅफेवर मोठी कारवाई! नेमकं प्रकरण काय?


पुणे : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि गुडलक कॅफे यांच्यावरही अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेने फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि डेक्कन परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे.

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने फर्ग्युसन रस्ता परिसरात अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आणि दुकानांनी पदपथ, सार्वजनिक रस्ता व्यापून केलेल्या बांधकामांवर कारवाई केली. यामध्ये हॉटेल वैशाली आणि गुडलक कॅफे यांचं सार्वजनिक रस्त्यावर वाढवलेलं बांधकाम हटवण्यात आलं आहे. पुण्यातील ही प्रसिद्ध हॉटेल्स आहेत.

महापालिकेने आधीच या व्यावसायिकांना नोटीस बजावल्या होत्या, मात्र कारवाईसाठी वेळ न घेतल्याने थेट जेसीबीद्वारे अतिक्रमण हटवण्यात आलं. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले, सार्वजनिक ठिकाणांवर केलेल्या कोणत्याही अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई अनिवार्य आहे. प्रसिद्धता पाहून सूट दिली जाणार नाही. शहरात सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होतो आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे.

दरम्यान, नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. काहींनी कारवाईमुळे पुरवठा सेवा आणि ग्राहकांना झालेल्या त्रासावर नाराजी व्यक्त केली आहे. हॉटेल वैशाली आणि गुडलक कॅफे हे पुण्याचे प्रतिष्ठित हॉटेल्स म्हणून ओळखले जातात. याठिकाणी नेहेमी गर्दी असते. याठिकाणी नाश्ता करण्यासाठी वेटिंगवर बसावे लागते.

संबंधित कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कारवाईमुळे बुधवारी संध्याकाळी या ठिकाणी आलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. कारवाईनंतर याठिकाणी गर्दी झाली होती. नंतर व्यवस्था सुरळीत करण्यात आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!