NEET घोटाळ्यात मोठी कारवाई! पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर अटकेत; मोटेगावकर कनेक्शनवर संशय…


पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातील एका नामांकित डॉक्टरला अटक केल्याची माहिती समोर आली असून, या कारवाईमुळे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, अटक करण्यात आलेल्या डॉक्टरवर स्वतःच्या मुलासाठी ‘नीट’ परीक्षेचा पेपर बेकायदेशीररित्या मिळवल्याचा गंभीर आरोप आहे. मुलाला वैद्यकीय प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळावेत आणि नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी या डॉक्टरने पेपरफुटी रॅकेटशी संपर्क साधल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सीबीआयने तपासादरम्यान संबंधित डॉक्टरला चौकशीसाठी समन्स बजावले होते. चौकशीदरम्यान संशय अधिक बळावल्याने अधिकाऱ्यांनी त्याला थेट अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अटक करण्यात आलेला डॉक्टर हा पेशाने बालरोगतज्ज्ञ असून सध्या पुण्यात वैद्यकीय व्यवसाय करत आहे. मात्र, तो मूळचा लातूर जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचा वारंवार उल्लेख होत असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे आणखी खोलवर जात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, लातूरमधील RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनाही याआधी CBIने अटक केली होती. मोटेगावकर यांच्या कोचिंग नेटवर्कमधूनच पेपरफुटीचे धागेदोरे समोर आल्याचा संशय आहे.

CBIच्या तपासात पुणे, लातूर, नागपूर आणि राजस्थानपर्यंत या रॅकेटचे कनेक्शन समोर येत असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. काही विद्यार्थी, पालक आणि कोचिंग क्लासेसही तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!