मोठी कारवाई! 15 कृषी अधिकारी निलंबित; कृषिमंत्री दत्ता भरणे यांचा मोठा दणका

पुणे : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागातील निविष्ठा वाटपातील कथित अनियमिततेप्रकरणी राज्य शासनाने मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनांच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी आढळल्याने 15 कृषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

माहितीनुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात सुमारे 24 कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आले होते. या प्रक्रियेत मयत शेतकऱ्यांच्या नावाने तसेच बनावट लाभार्थी दाखवून निविष्ठा वाटप केल्याचा आरोप समोर आला. त्यानंतर या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू झाली.


निलंबित अधिकाऱ्यांमध्ये तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी उपसंचालक, कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात येणार असून, अनियमिततेची सखोल तपासणी केली जाणार आहे.
या कारवाईमुळे राज्यभरातील कृषी यंत्रणेला स्पष्ट इशारा मिळाल्याची चर्चा आहे. चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, दोषी आढळणाऱ्यांवर पुढील प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.