मविआला एकामागोमाग चार धक्के! उमेदवार बाद, माघारी अन् संख्याबळाचा फटका; विधानपरिषदेत महायुतीचा विजयी चौकार जवळपास निश्चित?


मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला (मविआ) मोठे धक्के बसताना दिसत आहेत. एका ठिकाणी उमेदवाराचा अर्ज बाद झाला, दुसऱ्या मतदारसंघात अधिकृत उमेदवारानेच माघार घेतली, तर एका जागेवर मविआने उमेदवारच दिलेला नाही. दुसरीकडे महायुतीकडे असलेले मजबूत संख्याबळ पाहता सोलापूर, यवतमाळ, अमरावती आणि नाशिक या चारही मतदारसंघांत महायुतीचा विजयाचा मार्ग मोठ्या प्रमाणात मोकळा झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

राज्यातील 17 विधान परिषद जागांसाठी निवडणूक होत असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. मात्र, उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर काही मतदारसंघांतील राजकीय गणिते बदलली आहेत.

सोलापूर विधान परिषद मतदारसंघात महायुतीकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर मैदानात उतरले होते. मात्र, अर्ज छाननी प्रक्रियेत फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रमुख उमेदवारच रिंगणाबाहेर गेला आहे.

या मतदारसंघात एकूण 614 मतदार आहेत. त्यापैकी महायुतीकडे 428 मतदारांचे संख्याबळ असल्याचे सांगितले जाते, तर महाविकास आघाडीकडे अवघे 81 मतदार आहेत. त्यामुळे राजेंद्र राऊत यांचा विजय अधिक सोपा झाल्याचे मानले जात आहे.

यवतमाळमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनीच निवडणुकीतून माघार घेतली आहे. मतदारसंघातील संख्याबळ अपुरे असल्याचे कारण देत त्यांनी अर्ज मागे घेतला. उमेदवारी दिल्याबद्दल काँग्रेस नेतृत्वाचे आभार मानत त्यांनी निवडणूक लढवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

यवतमाळमध्ये एकूण 446 मतदार असून महाविकास आघाडीकडे केवळ 131 मतदार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मविआने येथे माघार घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अमरावतीत भाजपकडून प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपचेच कार्यकर्ते विप्लव बजोरिया यांनी बंडखोरी करत अर्ज भरला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर छाननी प्रक्रियेत बजोरिया यांचा अर्ज बाद करण्यात आला.

अमरावतीत एकूण 449 मतदारांपैकी महायुतीकडे 222 मतदारांचे संख्याबळ असल्याचे सांगितले जाते, तर महाविकास आघाडीकडे 148 मतदार आहेत. दरम्यान, अर्ज बाद झाल्यानंतर विप्लव बजोरिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

नाशिक विधान परिषद मतदारसंघात ही जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला सोडण्यात आली होती. मात्र, तेथून उमेदवारच देण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नसल्याचे चित्र आहे.

या मतदारसंघात महायुतीकडून नरेंद्र दराडे मैदानात आहेत. नाशिकमध्ये एकूण 603 मतदार असून महायुतीकडे तब्बल 454 मतदारांचे संख्याबळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येथील निवडणूकही महायुतीच्या बाजूने झुकल्याचे मानले जात आहे.

सोलापूरमध्ये विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद होणे, यवतमाळमध्ये माघार, अमरावतीत बंडखोर बाहेर पडणे आणि नाशिकमध्ये मविआचा उमेदवारच नसणे या घडामोडींमुळे चारही मतदारसंघांत महायुतीची स्थिती मजबूत झाल्याचे दिसत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता या चारही जागांवर महायुतीचा ‘विजयी चौकार’ जवळपास निश्चित मानला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!