रेल्वे फाटकांपासून महाराष्ट्राला मिळणार मुक्ती! तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपूल उभारणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा


नागपूर : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि आधुनिक दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच रेल्वे फाटकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील तीन वर्षांत राज्यात १४५ रेल्वे उड्डाणपुलांचे बांधकाम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, लवकरच महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नागपूर येथील वर्धमाननगर परिसरातील रेल्वे क्रॉसिंगवरील चार पदरी रस्ता आणि उड्डाणपुलासह राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या नऊ महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रेल्वे फाटक नसल्यामुळे होणारे अपघात रोखणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राज्यात ५२४ रेल्वे फाटकांची आवश्यकता असून, यापैकी १२१ फाटकांसह आणखी १४५ रेल्वे पुलांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. हे काम पुढील तीन वर्षांत महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) मार्फत पूर्ण करण्यात येणार आहे.

महारेलच्या माध्यमातून राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळाली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, नागपूरमधील भगवान संभनाथ चौक ते डिप्टी सिग्नल मार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिजला माजी उपमहापौर बाहरीनबाई सोनबोईर यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच शहरातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या १५० कोटी रुपयांच्या खर्चापैकी ४० कोटी रुपयांचा निधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात येणार आहे. नागपूरमधील अनेक प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले आहेत.

याशिवाय, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नागपूर महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ५०० पात्र स्वच्छता कर्मचाऱ्यांना लवकरच नियुक्ती आदेश देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!