महाराष्ट्र हादरला! एका नेत्याला भरधाव कारने चिरडलं, दुसऱ्यावर भररस्त्यात गोळीबार; निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन थरारक घटना

बदलापूर : विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच महाराष्ट्रात अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन धक्कादायक घटनांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. बदलापूरमध्ये मनसेच्या बड्या पदाधिकाऱ्याला भरधाव कारने उडवून चालक फरार झाला, तर श्रीरामपूरमध्ये शिंदे गटाच्या युवा नेत्यावर थेट गोळीबार करून जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोन्ही घटनांमुळे राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष राजेश शेटे हे ७ जूनच्या रात्री दुचाकीवरून जात असताना स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर एका भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की शेटे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे अपघाताची संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धडक दिल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
https://x.com/i/status/2064208908869325145

या घटनेचा धक्का ताजा असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आणखी एक थरारक घटना घडली. शिंदे गटाचे युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे हे रात्री कारमधून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर गोळ्या झाडल्या. मात्र हल्लेखोरांचा नेम चुकल्याने कहाणे यांचा जीव थोडक्यात बचावला. गोळीबारानंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, वाळू व्यवसायातील टोळी संघर्षातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोन्ही घटनांनंतर संबंधित भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
एका रात्रीत दोन नेत्यांवर जीवघेणे हल्ले, एक ICU मध्ये तर दुसरा थोडक्यात बचावला… निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. आता या दोन्ही प्रकरणांतील तपासातून नेमकं सत्य काय समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.