धक्कादायक! कॅमेऱ्यासमोर कपडे काढायला लावले, तब्बल ३० दिवस…; इंजिनिअर तरुणीसोबत घडलं भयंकर

नवी दिल्ली : आग्र्यात एका इंजिनिअर तरुणीला तब्बल १६ लाखांना लुबाडून तिला बॉडी स्कॅनच्या नावाखाली कॅमेऱ्यासमोर कपडे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सायबर गुंडांनी या तरुणीला ३० दिवस डिजिटल अटकेत ठेवून सीबीआय आणि नार्कोटिक्सची भीती दाखवली आणि तिच्याकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये १६ लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले. एवढेच नाही, तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा बनावट आदेशही पीडितेला पाठवला, ज्यामुळे तिला ही सर्व प्रक्रिया खरी वाटली.
सायबर गुंडांनी पीडितेला ‘तू बराच काळ मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकशील’ अशी भीती दाखवली. त्यानंतर त्यांनी पीडितेकडून पैशांची मागणी केली. जेव्हा तिने पैसे नसल्याचे सांगितले, तेव्हा तिला कर्ज घेण्यास भाग पाडले. मुलीने कर्जासाठी अर्जही केला, परंतु कर्ज मंजूर झाले नाही.
दरम्यान, या प्रकरणी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला राजस्थानच्या सीकर येथून अटक करण्यात आली असून, त्याने सांगितले की टोळीचा म्होरक्या हाँगकाँगमध्ये आहे. तिथून हे लोक लोकांना घाबरवतात आणि स्वतःला सीबीआय किंवा कस्टम अधिकारी म्हणून ओळख देऊन त्यांची फसवणूक करतात.
सायबर गुंडांनी अभियंता मुलीकडून प्रथम ९ लाख आणि नंतर ३ लाख रुपये घेतले. यानंतर, ८ जानेवारी रोजी पुन्हा २.१० लाख रुपये नवीन खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. या दरम्यान सायबर गुंडांनी मुलीला सतत फोनवर ठेवले, जेणेकरून तिला कोणाशीही संपर्क साधता येऊ नये आणि त्यांना तिच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवता यावे. १६ जानेवारी २०२५ रोजी मुलीला पुन्हा फोन आला. यावेळी एका मुलीने तिचे नाव अंकिता शर्मा असे सांगितले. तिने पीडितेला सांगितले की तिची नारकोटिक चाचणी प्रलंबित आहे आणि यासाठी ५ लाख रुपये ट्रान्सफर करा.
यासोबतच तिने सर्वोच्च न्यायालयाचा एक बनावट आदेशही पाठवला. पीडित मुलीने जेव्हा सांगितले की तिच्याकडे पैसे नाहीत, तेव्हा सायबर गुंडांनी तिला कर्ज घेण्यास भाग पाडले. मुलीने कर्जासाठी अर्ज केला, पण ते मिळाले नाही. यानंतर, सायबर गुंडांनी पुन्हा दोन लाख रुपये घेतले, ज्यामुळे तिचे एकूण १६ लाख रुपये हडपले गेले. यानंतर, हेमराज नावाच्या व्यक्तीने पुन्हा मुलीशी बोलले.
त्याने सांगितले की तिला नारकोटिक चाचणी करावी लागेल, ज्यामध्ये तिला आपले कपडे काढावे लागतील आणि तिचा टॅटू दाखवावा लागेल, ज्यामुळे तिचा खटला साफ होईल. पीडितेने विचारले की यासाठी तिला मुंबईला यावे लागेल का, तेव्हा तो म्हणाला की जर ती मुंबईत आली तर केस बिघडेल. तिला फक्त व्हिडिओ कॉलवर तिचा टॅटू दाखवावा लागेल.
अभियंत्याने तिच्या शरीरावर कोणताही टॅटू नसल्याचे अनेक वेळा नाकारले. परंतु, सायबर गुंडांनी तिला धमकावले. त्यानंतर त्यांनी बॉडी स्कॅनच्या नावाखाली तिचे कपडे काढायला लावले, ज्यामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसला. यानंतर, गुंडांनी २३ जानेवारी रोजी बनावट निकालपत्र पाठवले.
२९ जानेवारी रोजी त्यांनी सांगितले की आता ऑनलाइन कनेक्ट राहण्याची गरज नाही. यानंतर, पैसे परत करण्यास सांगितले असता, कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्यानंतर मुलीला समजले की तिला डिजिटली अटक करण्यात आली होती आणि तिची फसवणूक करण्यात आली होती.