प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं; लग्नाचं वचन दिलं अन् पुण्यातील 41 वर्षीय व्यक्तीसोबत केला मोठा गेम..

पुणे : सोशल मीडियावर झालेली ओळख, प्रेमाच्या गप्पा आणि लग्नाची स्वप्ने… पण या सर्वामागे सुरू होता फसवणुकीचा मोठा डाव. पुण्यातील एका ४१ वर्षीय नागरिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तब्बल १६.५० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात संबंधित महिलेसह तिच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या ४१ वर्षीय नागरिकाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची ओळख झाली होती. काही दिवसांतच दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. महिलेने प्रेम व्यक्त करत लग्नाचे आश्वासन दिल्याने तक्रारदाराचा तिच्यावर पूर्ण विश्वास बसला.

यानंतर महिलेने परकीय चलन (फॉरेक्स) व्यवहारांमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळेल, असे सांगून तक्रारदाराला गुंतवणुकीस प्रवृत्त केले. सुरुवातीला नफा मिळत असल्याचे दाखवून विश्वास अधिक दृढ करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी वेळोवेळी पैसे मागण्यात आले.

प्रेम आणि लग्नाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदाराने विविध खात्यांमध्ये एकूण १६ लाख ५० हजार रुपये जमा केले. मात्र, गुंतवलेली रक्कम परत मागितल्यानंतर महिलेने आणि तिच्या साथीदारांनी प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली.
तक्रारीनंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांची आणि ऑनलाईन व्यवहारांची माहिती तपासली जात आहे. तसेच संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर झालेल्या ओळखीच्या आधारे आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि खात्रीशिवाय पैसे गुंतवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.