एलपीजी सिलेंडरच्या दरात पुन्हा कपात! एवढ्या रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन दर..

नवी दिल्ली : गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात ग्राहकांसाठी गॅस सिलेंडर दरांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कपात जाहीर केली असून, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने अनुदानाची घोषणा केली आहे.

मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यावेळी देखील १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. नवीनतम कपातीनंतर, आता दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १५८० रुपयांवर आली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाही त्याच्या किमती कमी झाल्या होत्या. १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि ते स्थिर आहेत. या बदलानंतर, १ सप्टेंबर २०२५ पासून नवीन किमती लागू करण्यात आल्या आहेत.

याआधीही दरात सातत्याने घट करण्यात आली होती. ऑगस्टमध्ये ३३.५० रुपये, जुलैमध्ये ५८.५० रुपये, तर जूनमध्ये २४ रुपयांनी दर कमी करण्यात आले होते. एप्रिलमध्ये हा दर १,७६२ रुपये होता. त्यामुळे व्यवसायिकांना रोजच्या स्वयंपाक आणि उत्पादन खर्चात थोडा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सामान्य ग्राहकांना दरकपातीची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक १४.२ किलोच्या सिलेंडरवर ३०० रुपयांचे अनुदान २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आले आहे. या लाभाचा फायदा वर्षाला जास्तीत जास्त ९ सिलेंडरपर्यंत मिळेल. लहान ५ किलोच्या सिलेंडरसाठीही प्रमाणानुसार अनुदान दिले जाईल. सरकार यासाठी तब्बल १२,००० कोटी रुपये खर्च करणार आहे.