प्रेमाचा ‘क्राइम ट्विस्ट’! 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसोबत पळाली; हॉटेलमध्येच झाला सगळा ‘गेम ओव्हर’

अहमदाबाद : “प्रेमासाठी मोठा डाव… पण शेवटी झाला विश्वासघाताचा गेम!” अशी धक्कादायक कहाणी अहमदाबादच्या निकोल परिसरातून समोर आली आहे. एका ज्वेलरी शोरूममधून तब्बल 1.66 कोटी रुपयांचे दागिने लंपास करून बॉयफ्रेंडसोबत पळण्याचा प्लॅन फसल्याने संपूर्ण प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

11 मे रोजी घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडवली. शोरूममध्ये गर्दी असताना आणि मालक जेवणासाठी बाहेर गेले असताना सेल्सगर्ल हर्षिदा शेट्टीने संधी साधून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने गायब केल्याचा आरोप आहे. सोन्याच्या साखळ्या, लॉकेट, अंगठ्या, मंगळसूत्र आणि इतर दागिने असा एकूण 1.66 कोटींचा ऐवज चोरीला गेला.
सुरुवातीला हा प्रकार साधा चोरीचा वाटला, पण सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आला. हर्षिदा ब्लेझरमध्ये दागिने लपवत असल्याचे स्पष्ट दिसून आल्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला.

तपासात समोर आले की हर्षिदा आणि तिचा बॉयफ्रेंड मयूर माळी यांनी मिळून हा संपूर्ण प्लॅन तयार केला होता. चोरीनंतर दोघे अहमदाबाद सोडून दिल्लीमार्गे उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये लपून बसले होते.

मात्र खरी कहाणी चौथ्या दिवशी समोर आली आणि सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघे एका हॉटेलमध्ये राहत असताना हर्षिदा अंघोळीला गेली. त्याच वेळी मयूरने सर्व चोरलेले दागिने घेऊन पलायन केले आणि तो फरार झाला.
अंघोळ करून परत आल्यानंतर हर्षिदाला बॉयफ्रेंड आणि संपूर्ण मुद्देमाल गायब असल्याचे समजले. पैसे संपल्याने आणि पर्याय नसल्याने ती पुन्हा अहमदाबादला परतली.
मंगळवारी संध्याकाळी ती चोरीतील दागिने विकण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकली. पोलिसांनी तिला अटक केली असून तिचा बॉयफ्रेंड मयूर माळी अजूनही फरार आहे.
या घटनेमुळे प्रेम, विश्वासघात आणि गुन्हेगारी यांचा धक्कादायक संगम उघड झाला असून संपूर्ण शहरात या ‘डबल क्रॉस’ स्टोरीची जोरदार चर्चा सुरू आहे.