प्रेमाचं रूपांतर भयावह घटनेत; मॉलमधील ओळख ठरली जीवघेणी, पुण्यात तरुणीवर ब्लेड हल्ला

पुणे : सध्या महाराष्ट्रात महिलांवरील गुन्हे आणि प्रेमसंबंधातून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. पुण्यातील चंदननगर परिसरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून 22 वर्षीय तरुणीवर तिच्याच प्रियकराने जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकाच मॉलमध्ये काम करत होते आणि तिथेच त्यांची ओळख प्रेमसंबंधात बदलली. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. या वादातूनच आरोपी दिलीप राठोड हा तरुणीच्या घरी गेला आणि तिथेच भयंकर घटना घडली.
तरुणी घरात एकटी असताना आरोपीने वाद घालत तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या तरुणीने कसेबसे भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिचा भाऊ तात्काळ घरी पोहोचला.

घरी पोहोचल्यावर त्याने पाहिले की तरुणी गंभीर अवस्थेत होती. तिने बोलता न आल्याने पेन आणि कागद मागवून आरोपीचे नाव लिहून दिले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करत आरोपीला अटक केली आहे.

तरुणीला आधी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राज्यात अलीकडे प्रेमसंबंधातून होणारे हल्ले, कौटुंबिक हिंसा आणि महिलांवरील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. नसरापूरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण, कुटुंबातीलच गुन्हे आणि आता पुण्यातील ही घटना यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चंदननगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.