प्रेम, ब्लॅकमेल की कट? रूम नंबर २०५ मध्ये नेमकं काय घडलं…डेडबॉडीच आल्या बाहेर

झाशी : उत्तर प्रदेशातील झाशी शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील ‘हॉटेल रॉयल इन’च्या रूम क्रमांक २०५ मध्ये एका प्रेमी युगुलाने विष प्राशन करून जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

मृतांमध्ये २३ वर्षीय युवराज यादव आणि ३४ वर्षीय भारती हिचा समावेश आहे. युवराज हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, तर भारती विवाहित असून एका मुलाची आई होती. दोघांचेही प्रेमसंबंध गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
रविवारी दुपारच्या सुमारास हॉटेल कर्मचाऱ्यांना रूम क्रमांक २०५ मधून कोणतीही हालचाल जाणवत नव्हती. अनेकदा दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा उघडताच आत दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. पोलिसांनी तातडीने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान दोघांनाही मृत घोषित केले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दोघांनी विषारी पदार्थ प्राशन केल्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

युवराजच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. भारतीने प्रेमाच्या नावाखाली युवराजला मानसिक त्रास दिला आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच तिनेच युवराजला हॉटेलमध्ये बोलावून आधी त्याला विष पाजले आणि नंतर स्वतःही विष प्राशन केले, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारती ही युवराजच्या घराशेजारी राहत होती. तिच्या मुलाच्या माध्यमातून दोघांमध्ये ओळख झाली आणि त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र या नात्याची कल्पना दोन्ही कुटुंबांना नव्हती.
दरम्यान, या घटनेमुळे झाशी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस हॉटेलमधील नोंदी, सीसीटीव्ही चित्रफीत आणि कुटुंबीयांच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास करत आहेत.